'सुखी ठेव साऱ्या गावा' :रिंगण चित्रपटातून आदर्श शिंदेची विठ्ठलाला साद


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / मुंबई :
 रिंगण चित्रपटातील ‘विठ्ठला’ हे गाणं नुकतच प्रदर्शित करण्यात आलं आहे. आजवर भक्तांच्या लाडक्या विठू माऊलीचे गुणगाण करणारी कित्येक गाणी प्रदर्शित झाली. मात्र रिंगण चित्रपटातील ‘विठ्ठला’ या गाण्यातून विठू माऊलीला प्रश्न करण्यात आला आहे. या गाण्यात शेतकऱ्याच्या भूमिकेतील शशांक शेंडे विठ्ठलाला, “कुठे आहेस बाबा तू? हा प्रश्न विचारून पुढे म्हणतात, “जास्त नाही मागत मी, निदान पोटापुरतं तरी दे”.... शशांक शेंडेचे हे शब्द सगळ्यांच्याच जीवाचा ठाव घेतात.
दुष्काळामुळे शेतकऱ्याला सोसाव्या लागलेल्या यातना आणि त्याने विठ्ठलाला घातलेली आर्त साद या गाण्यातून दिसते. आपल्या परिस्थितीशी लढताना बरेच चढ-उतार या बाप-लेकाच्या आयुष्यात येतात. जिथे कधी हा बाबा आपल्या मुलावर चिडलेला दिसतो तर कधी या लहानग्याच्या अपेक्षा बाबा पूर्ण करू न शकल्यामुळे त्याचा रोष समोर येतो. एकंदर आपल्या माऊलीने आपल्यासमोर उभा केलेला आयुष्याचा प्रश्न ही माऊलीच सोडवेल या अपेक्षेने हा शेतकरी विठ्ठलाला साद घालतो. सगळ्यांच्याच हाकेला धावून येणारी विठू माऊली गावाकडून पंढरपूरकडे निघालेल्या या बाप-लेकाच्या जोडीला स्वत:च्या आयुष्यात चमत्कार घडवून आणण्याची ताकत कशी देते, हे चित्रपट पाहिल्यावर कळेल. मात्र आदर्श शिंदे ने गाण्यातून विठ्ठलाला घातलेली साद माऊलीच्या भक्तांपर्यंत नक्कीच पोहोचते आहे.
दासू वैद्य लिखित या गाण्यांना रोहीत नागभीडे यांनी संगीताचा साज चढवला आहे. तर चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन मकरंद माने यांचे असून छायाचित्रदिग्दर्शन अभिजीत अब्दे यांनी केले आहे. तर विधि कासलीवाल या चित्रपटाची प्रस्तुती करत आहेत.
लॅन्डमार्क फिल्म्स प्रस्तुत आणि माय रोल मोशन पिक्चर्स निर्मित ‘रिंगण’ हा चित्रपट येत्या ३० जूनला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

   Print


News - Rajy | Posted : 2017-06-26
Related Photos