बोलेरोची एसटी बसला धडक, एक ठार, एक गंभीर


- सात जण किरकोळ जखमी

- उमानूरजवळील घटना

 विदर्भ न्यूज एक्सप्रेस

प्रतिनिधी / अहेरी: आलापल्ली - सिरोंचा मार्गावरील उमानूर गावापासून १ किमी अंतरावर बेजुरपल्लीवरून जिमलगट्टा येथील आठवडी बाजारासाठी प्रवासी घेवून येत असलेल्या बोलेरो वाहनाने उभ्या बसला मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात १ जण ठार तर १ जण गंभीर जखमी झाला आहे. अन्य सात जण किरकोळ जखमी झाले आहेत. मृतक इसम बेजुरपल्ली येथील उपसरपंच आहे.

पोचा कुले गावडे असे मृतकाचे नाव असून ते बेजुरपल्ली येथील उपसरपंच होते. राजेश रोशन दुर्गे (३७) रा. मरपल्ली हा गंभीर जखमी आहे. तर किरकोळ जखमींमध्ये लक्ष्मी ढुरके (५०) रा. बेजुरपल्ली, लक्ष्मी इरपा मडे, सोनी बका वेलादी (२२) , सिरीया पेंटा वेलादी (२५) , शंकर दुर्रापा अटेला (४५) , कुले रामा वेलादी (५०) , तुंगी व्यंकटेश मडावी सर्व रा. बेजुरपल्ली यांचा समावेश आहे.

प्राप्त माहितीनुसार बोलेरो वाहन क्रमांक एमएच ३३ जी १३२९ ने बेजुरपल्ली येथून काही नागरिक जिमलगट्टा येथील आठवडी बाजारासाठी येत होते. दरम्यान उमानूरपासून १ किमी अंतरावर एमएच ४० एक्यू ६०७१ क्रमांकाची बस उभी होती. चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहनाची बसला मागून जबर धडक बसली. यामध्ये एक जण जागीच ठार झाला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार या वाहनात  २५ ते ३० प्रवासी बसले होते. जखमींना तत्काळ रूग्णालयात हलविण्यात आले आहे.

आलापल्ली - सिरोंचा मार्गावर अपघाताची मालिका सुरूच

मागिल काही दिवसांपासून आलापल्ली - सिरोंचा मार्गावर अपघातांची मालिका सुरू असून अनेकांनी प्राण गमावले आहे. मागिल काही दिवसांपूर्वी याच मार्गावर एका महिंद्रा मॅक्स आणि टकची धडक होवून ६ जण ठार झाले होते. तसेच उमानूर पहाडीवर तेंदूपत्ता मजूरांना घेवून जाणारी टॅव्हल्स व ट्रक उलटून अनेकजण जखमी झाले. तसेच एका कारचाही अपघात होवून यामध्ये ४ जण जखमी झाले होते.   Print


News - Nagpur | Posted : 2017-05-22
Related Photos