माजी आ. सुभाष धोटेंच्या नेतृत्वात धडकला शेकडो शेतकऱ्यांचा तहसील कार्यालयावर महामोर्चा


- तहसीलदारांना दिले ‘माझी कर्जमाफी झाली नाही’चे ५ हजार अर्ज
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / कोरपना :
महाराष्ट्र सरकारने कर्जमाफीच्या नावावर शेतकऱ्यांची दिशाभूल केलेली आहे. रोज नवनवीन शासन निर्णय काढून शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे काम फडणवीस सरकारकडून सुरु आहे. ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेमुळे शेतकरी वैतागला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा घेऊन महाराष्ट्र कॉंग्रेस कमेटीचे सरचिटणीस तथा राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वात तालुका कॉंग्रेस, युवक कॉंग्रेस व महिला कॉंग्रेसच्या वतीने आज दि.७ ला दुपारी २ वाजता कोरपना तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांच्या महामोर्चा धडकला.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसच्या वतीने सुरु असलेल्या ‘माझी कर्जमाफी झाली नाही’ या योजनेंतर्गत शेतकऱ्यांकडून कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी भरून घेतलेले ५ हजार अर्ज तहसीलदार हरीश गाडे यांच्याकडे देण्यात आले. यावेळी माजी आमदार सुभाष धोटे यांनी म्हटले की, केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील फडणवीस सरकार शेतकरी, शेतमजूर, कामगार, शोषित, पीडितांना फक्त आश्वासनाचे गजर देत आहे. त्यापलीकडे काही नाही. शेतकऱ्यांची कर्जमाफी केली म्हणून शासन गाजावाजा करीत आहे. मात्र प्रत्यक्षात किती शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली असा सवाल त्यांनी शासनाला केला. हल्लीचे सरकार हे फसणवीस सरकार असल्याचेही त्यांनी म्हटले. शासनाने दुर्गम व आदिवासी भागातील शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज भरण्याच्या सूचना केल्या आहे. मात्र ऑनलाईन अर्ज भरणे आदिवासी भागातील शेतकऱ्यांना शक्य होत नाही आहे. अनेक ठिकाणी इंटरनेटची व्यवस्था नाही. वेगवेगळ्या जटील अटी व शर्ती लादून कर्जमाफी केली आहे म्हणणाऱ्या शासनाला धडा शिकविण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कामेटीच्या वतीने राज्यात ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही अशा शेतकऱ्यांकडून कॉंग्रेसने ‘माझी कर्जमाफी झाली नाही’ म्हणून अर्ज भरून घेतले आहे. यामध्ये शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला आहे असे त्यांनी सांगितले असून शेतकरी शेतमजूर व कामगारांना जागृत करण्यासाठी व त्यांना नयन मिळवून देण्यासाठी संपूर्ण विधानसभा क्षेत्रात असे मोर्चे काढणार असल्याचे सांगितले.
  महाराष्ट्र कॉंग्रेस कमेटीचे सरचिटणीस तथा राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वात निघालेल्या या मोर्चात तालुका अध्यक्ष विठ्ठल थिपे, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष विजय बावणे,  पं.स. सभापती शाम रणदिवे, उपसभापती संभाशिव कोवे, जि.प. सदस्य शिवचंद्र काळे, विनाताई मालेकर, कल्पना पेचे, माजी जि.प. सदस्य उत्तम पेचे, सीताराम कोडापे, युवक कॉंग्रेसचे विधानसभा अध्यक्ष आशिष देरकर, महासचिव विक्रम येरणे, सतीश बेतावर, उमेश राजूरकर, महिला कॉंग्रेसच्या अध्यक्ष ललिता गेडाम, दिवाकर बोरडे,  सुरेश मालेकर, वहाब भाई, रसूल पटेल, अभय मुनोत, गणेश गोडे, संजय जाधव, मुरलीधर बल्की, वामन मुसळे, बाळा वडस्कर, बंडूभाऊ धोटे आदींसह कोरपना तालुक्यातील हजारो शेतकरी व कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता.
राहुल गांधींवरील भ्याड हल्ल्याचा निषेध – सुभाष धोटे 
 गुजरातमध्ये राहुल गांधी यांच्यावर झालेला हल्ला म्हणजे लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार आहे. विकृत विचारसरणी असलेल्या लोकांकडूनच अशी अपेक्षा करता येते. ७० वर्षाच्या काळात कॉंग्रेसकडून भाजपच्या नेतृत्वाला अशाप्रकारच्या घटनांना सामोरे जाण्याची वेळ आली नव्हती. कारण कॉंग्रेस संस्कृती जपते. मात्र अल्पावधीत भाजपच्या लोकांची वृत्ती तानाशाही झाल्याचे सुभाष धोटे यांनी म्हटले.   Print


News - Chandrapur | Posted : 2017-08-07
Related Photos