बत्तीगुलमुळे कोडीगाववासीय जगतात अंधारात जीवन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गोमणी:
माहिती तंत्रज्ञानाच्या युगात देशाचा काही प्रमाणात विकास होत असला तरी अतिमागास गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागात साधी विजही पोहचली नाही. ज्या ठिकाणी विज पोहचली त्या ठिकाणी वारंवार होणार्या विजपुरवठ्याने नागरिक हैराण आहेत. अशाच समस्येने तालुक्यातील कोडीगाववासीय त्रस्त असून दररोज होणाऱ्या ‘बत्ती गुल’ मुळे नागरिकांना अंधारातच जीवन जगावे लागत आहे.
तंत्रज्ञानाच्या युगात जिल्ह्यातील दुर्गम भागातील गावे एक पाउल मागेच आहेत. इंटरनेट, सोशल मिडीया, आॅनलाईन कामे करून अत्यंत गरजेच्या सोयी - सुविधा मिळवाव्या लागतात. मात्र विजेच्या लपंडावामुळे या सुविधा मिळविण्यासाठी प्रचंड अडचण सहन करावी लागत आहे. मुलचेरा तालुक्यातील गावांना ३३ केव्ही विद्युत वाहिणीच्या माध्यमातून विजपुरवठा केला जात आहे. मुलचेरा उपकेंद्रात कोपरअल्ली, मुलचेरा, सुंदरनगर या तीन केंद्रांवरून विजपुरवठा केला जात आहे. तरीही तालुक्यातील अनेक गावातील नागरिकांना खंडीत विजपुरवठ्याची समस्या भेडसावत आहे. हलक्या व मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी आल्या तरी महावितरणकडून लगेच विजपुरवठा खंडीत होत आहे. कोडीगाव येथे उन्हाळ्यापासूनच विजेची समस्या भेडसावत आहे. आत्ताही तिच परिस्थिती असून परिसरातील ३ ते ४ गावांना विजपुरवठ्याच्या अनियमिततेने हैराण करून सोडले आहे. नागरिकांना विजेअभावी शासकीय योजनांचा लाभ घेणेही अडचणीचे ठरत आहे. यामुळे कोडीगाव येथे लाईनमनची नियुक्ती करावी, अशी मागणी केली जात आहे.
आंबटपल्ली ग्रामपंचायत मध्ये येत असलेल्या कोडीगाव, चिचेला येथील विजपुरवठा सुरळीत करण्यात यावा. रात्रीच्यावेळी सरपटणाऱ्या प्राण्यांपासून धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे बाहेर जाणाऱ्या नागरिकांना सदर प्राण्यांपासून धोका निर्माण होवू शकतो. नागरिकांना जिवसुध्दा गमवावा लागू शकतो. यामुळे महावितरणने विजपुरवठा तत्काळ सुरळीत करावा.
उमेश कडते
ग्रा.पं. सदस्य आंबटपल्ली

   Print


News - Gadchiroli | Posted : 2017-08-07
Related Photos