हरित रेल्वे स्थानक म्हणून चंद्रपूर-बल्लारपूर रेल्वेस्थानकाच्या सुशोभीकरणास सुरुवात


- पालकमंत्र्यांनी प्राथमिक कामे तीन महिण्यात काम पूर्ण करण्याचे दिले आदेश
 विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
जिल्हा प्रतिनिधी / चंद्रपूर :
चंद्रपूर व बल्लारपूर रेल्वेस्थानाकांवर उतरणाऱ्या  प्रवाशांना आणि या ठिकाणावरुन प्रवास करणाऱ्या  प्रवाशांना आता चंद्रपूर व बल्लारपूर रेल्वेस्थानकांवर जंगल, वन्यजीव, वनसंपदा आणि ताडोबाच्या वाघांच्या प्रतिकृती, रेखाचित्रण, उत्थीत शिल्पकृती असे आधुनिक चित्रकलेचे विविध अंग बघायला मिळणार आहे. आपली रेल्वे जणू ताडोबांच्या जंगलातून पुढे जात असल्याचा भास होणार आहे. पुढील तीन महिन्यात प्राथमिक कामे पूर्ण होणार असून लवकरच  हे दृष्यचित्र साकारले जाणार आहे.
राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री  सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर व बल्लारपूर रेल्वेस्थानकावरुन प्रवास करणाऱ्या  प्रवाशांना महाराष्ट्रातील वेगळया रेल्वे स्टेशनला भेट दिल्याचा आनंद होईल, असे सूतोवाच केले होते. त्या दृष्टीने आजपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली असून अनेक चित्रकार यासाठी दाखल झाले आहे.  ना.मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने या दोन्ही रेल्वे स्थानकांचे सौंदर्यीकरण करून ही रेल्वे स्थानके हरित रेल्वे स्थानक म्हणून विकसित करण्याचा राज्य शासनाने यापूर्वीच निर्णय  घेतला आहे. ही दोन्ही रेल्वे स्थानके देशातील पहिली हरित रेल्वे स्थानके ठरणार आहेत.
चंद्रपूर जिल्हयातील जगप्रसिध्द ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाबाबत जनजागृती व पर्यटन वाढीच्या दृष्टीने व्यापक प्रचार व प्रसिध्दी करण्यासाठी चंद्रपूर व बल्लारपूर येथील रेल्वे स्थानकांचे सवाई मोधोपूरच्या धर्तीवर सौंदर्यीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या रेल्वे स्थानकांवर खुल्या जागेवर शासकीय चित्रकला महाविद्यालय, नागपूर यांना ताडोबाच्या धर्तीवर चित्र रंगविण्याची परवानगी देण्यात आली असून त्या माध्यमातून वन आणि वन्यजीव यांचे महत्व अधोरेखित करण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी चंद्रपूर तसेच अधिष्ठाता शासकीय कला व अभिकल्प महाविद्यालय, नागपूर यांनी या संदर्भात सादर केलेल्या अंदाजपत्रकांना शासनाने मान्यता दिली असून या शासकीय संस्थेच्या माध्यमातून तसेच कला संचालनालयाच्या माध्यमातून ही दोन्ही रेल्वे स्थानके हरित रेल्वे स्थानके म्हणून विकसित करण्यात येणार आहेत. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या वित्त व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे चंद्रपूर आणि बल्लारपूर ही दोन्ही रेल्वे स्थानके आता हिरवाईने नटून नवे रूप धारण करत पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनणार आहे. चित्रकारांनी या संदर्भातील काम तातडीने पूर्ण करावे, असे आदेश देण्यात आले आहे. नागपूर येथील चित्रकला महाविद्यालयाचे प्रा.मानकर हे या प्रकल्पाचे प्रमुख असून त्यांच्या नेतृत्वात चित्रकारांची चमू चंद्रपूरच्या रेल्वेस्थानकावर दाखल झाली आहे. चंद्रपूर नंतर बल्लारपूर येथे काम सुरु होणार आहे.  Print


News - Chandrapur | Posted : 2017-08-05
Related Photos