पोलीस ठाण्याच्या जिप्सीतुनच केली पकडलेल्या अवैद्य दारूची परस्पर विक्री ?


-  पोलीस उपनिरीक्षक  पठाण चा प्रताप 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / देसाईगंज :
 देसाईगंज पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक  सोहेल पठाण यांनी अवैद्य दारू व्यावसायिकांकडून तब्बल १०० पेट्या दारू पकडली असली तरी गुन्हा दाखल करताना केवळ ४० पेट्या दाखवून उर्वरित ६० पेट्या दारू देसाईगंज येथील स्थानिक अवैद्य दारू व्यावसायिकांना पोलीस स्टेशन च्या जिप्सी या शासकीय गाडीने घरपोच नेऊन दिल्याची खळबळजनक तेवढीच धक्कादायक माहिती या प्रकरणाशी संबंधित  तीन पोलीसांनी दिलेल्या साक्षीतुन पुढे आल्याने खळबळ निर्माण झाली आहे.    
  पोलीस उपनिरीक्षकाने पकडलेली अवैद्य दारू परस्पर विक्री करुन अवैद्य व्यवसायाला चालना देत असल्याचे प्रकरण पोलीस उपनिरीक्षक सोहेल पठाण सोबत असलेल्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांच्या  बयाणातुन स्पष्ट झाले असून अशा भ्रष्ट पोलीस उपनिरीक्षकाबाबत   वृत्त प्रसिद्ध होताच पोलीस विभागात एकच खळबळ उडाली आहे. काल  ३१ जुलै रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात पोलीस जिप्सी चालक, पोलीस हवालदार, दोन शिपाई व पोलीस उपनिरीक्षक सोहेल पठाण यांची पेशी झाली. मात्र हे प्रकरण पोलीस विभागासाठी अतिशय लाजिरवाणे असुन फारच गंभीर असल्याने  पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख जातीने व्यक्तीशः पेशी घेत असल्याचे सांगितले जात आहे. 
दरम्यान या अवैध दारू पकडण्याच्या कारवाईत सहभागी असलेले पोलीस हवालदार अशोक वसंत मिर्धा , नापोशि अरविंद दामाजी वालदे  , नापोशि जितेंद्र उमाजी भोयर   या तिघांनी पकडलेली अवैद्य दारू परस्पर विक्री प्रकरणात बयाण नोंदवले  असून या तिघांनीही देसाईगंज पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सोहेल पठाण यांनी घटनास्थळी १०० पेट्या दारू पकडली मात्र अपराध क्रमांक ६१२५ मध्ये कलम ६५(ई) मुंबई दारू कायदा अन्वये गुन्हा दाखल असून यात गुन्ह्य़ात केवळ ४० पेट्या दारू दाखवून उर्वरित ६० पेट्या दारू देसाईगंज येथील अवैद्य दारू व्यावसायिक अनिल गेडाम याला ४० पेट्या तर गुरुबच्चन मक्कड ला २० पेट्या अवैद्य दारू कशी आणि कुठे विकली याबाबत सविस्तर माहिती आपल्या बयाणात नोंदवली आहे. उमेश गेडाम नापोशि बक्कल  याच्यासोबत पोलीस उपनिरीक्षक सोहेल पठाण याने पोलीस स्टेशनच्या जिप्सी या शासकीय गाडीने अनिल गेडाम व गुरू बच्चन मक्कड  यांना घरपोच नेऊन देऊन विकली. देसाईगंज पोलीस स्टेशनने या दोघांचाही  तडीपार चा प्रस्ताव जिल्हा पोलीस प्रशासनाकडे पाठविण्यात आले आहे, हे येथे उल्लेखनीय. अशा अवैद्य दारू व्यावसायिकांना देसाईगंज येथील पोलीस उपनिरीक्षक सोहेल पठाण याने संपूर्ण गडचिरोली जिल्ह्य़ात दारू बंदी असताना देसाईगंज तालुक्यातील अवैद्य व्यवसायाचा समुळ उच्चाटन करण्याऐवजी पकडलेली अवैद्य दारू परस्पर विक्री करुन अवैद्य व्यवसायाला चालना देत असल्याचे निदर्शनास आले आहे.  अशा पोलीस उपनिरीक्षकावर कायदेशीर कारवाई करुन ताबडतोब निलंबित करण्यात यावे अशी मागणी होत आहे.  

पठाण चा कसूरी अहवाल सादर

वृत्तपत्रात बातम्या आल्याने वरिष्ठांनी अहवाल मागितला होता. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक सोहेल पठाण यांनी पकडलेली अवैद्य दारू परस्पर विक्री करुन अवैद्य व्यवसायाला चालना देत असल्याबाबतचा तीन पोलीस कर्मचाऱ्यांची  साक्ष घेऊन कसूरी अहवाल पोलीस अधीक्षक कार्यालयास  ३१ जुलै २०१७ ला सादर करण्यात आला आहे.
अतुल तवाडे, प्रभारी ठाणेदार, पोलीस स्टेशन देसाईगंज  Print


News - Gadchiroli | Posted : 2017-08-03
Related Photos