छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी : राष्ट्रपती कोविंद


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नवी दिल्ली   :
एक प्रखर यौध्दा, कुशल राज्यकर्ता, उदार व प्रजाहितदक्ष राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काढले.
  अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्यावतीने राजधानीत 19 व 20 फेब्रुवारी 2018 दरम्यान वैविध्यपूर्ण कार्यक्रमांच्या आयोजनांसह शिवजयंती सोहळयाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या मुख्यसमारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रपती यांनी यावेळी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत, नौदल प्रमुख ॲडमीरल सुनील लांबा, श्री शाहु छत्रपती महाराज आणि खासदार छत्रपती संभाजी राजे यांची मंचावर विशेष उपस्थिती होती.
 राष्ट्रपती म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या 50 वर्षांच्या जीवनकाळात दैदिप्यमान कार्य केले. त्यांनी अन्यायाविरूध्द आवाज उठवून स्वकीयांमध्ये आत्मसन्मान जागविला. शिवाजी महाराज अद्वितीय यौध्दा म्हणून जगभर परिचित आहेत. त्यांनी सर्वप्रथम गनीमी काव्याचा प्रभावी उपयोग केला. शिवाजी महाराजांनी देशात सर्वप्रथम नौसेनेची स्थापना केली. त्यांनी अनेक गड किल्ले उभारले. धर्म, जात यापेक्षा त्यांनी कतृत्वाला आपल्या राज्यकारभारात महत्व दिले. त्यांच्या राज्यात महिलांना सन्मानाची वागणूक दिली जात असे. प्रजाहितदक्ष व लोककल्याणकारी राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य  आजही सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे ते म्हणाले.

 
  राजधानीत मिनी कोल्हापूर अवतरले : राष्ट्रपती      

 राजधानी दिल्लीत छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे भव्य आयोजन कौतुकास्पद आहे. आज छत्रपती शिवाजी महाराजांची दिल्लीतील शोभायात्रा आणि यातील सर्व शिवभक्तांचा सहभाग महत्वपूर्ण आहे. या सोहळयाच्या मुख्य कार्यक्रमाकरिता उपस्थितांचा खास पेहराव जणू दिल्लीत मिनी कोल्हापूर अवतरल्याचा अनुभव देत आहे अशा शब्दात राष्ट्रपतींनी उपस्थितांचे कौतुक केले.

  राष्ट्रपतींना शिवाजी महाराजांची  प्रतिमा भेट

  या कार्यक्रमात खासदार छत्रपती संभाजी राजे यांच्या हस्ते राष्ट्रपतींना छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट देण्यात आली. यासंदर्भात आपल्या भाषणात विशेष उल्लेख करत राष्ट्रपती म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेमुळे आता राष्ट्रपती भवनातील उणीव भरून निघाली.
 यावेळी खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी आपल्या स्वागतपर भाषणात छत्रपती शिवाजी महराजांच्या व्यक्तीमत्वाचे विविध पैलू  उलगडून दाखविले. तसेच, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती हा राष्ट्रीय उत्सव व्हावा अशी अपेक्षाही व्यक्त केली. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, कर्नल ऑफ द रेजिमेंट मराठा लाईट इन्फेट्री पी.जे.एस.पन्नु यावेळी उपस्थित होते.  या कार्यक्रमानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर आधारीत  "शिवगर्जना' महानाट्याचा प्रयोग झाला.  Print


News - World | Posted : 2018-02-19
Related Photos