ग्रामगितेतून आदर्श गाव निर्माण होईल : ग्रामगिताचार्य बंडोपंत बोढेकर


 - मालदूगी येथे गुरुदेव सेवा मंडळाची स्थापना
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी /  कुरखेडा :
 गाव हा विश्वाचा नकाशा असून गावावरुन देशाची परिक्षा होत असते. गावाचा विकास हा महापुरुषांच्या प्रेरणेतून व गावकऱ्यांच्या   सामुहिक प्रयत्नातून होत असतो. आपला गाव स्वयंपुर्ण व्हावा यासाठी आपणच पुढाकार घ्यावा. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगितेतून सामाजिक परिवर्तन व्हावे, यातूनच आदर्श गाव निर्माण होईल. असे प्रतिपादन ग्रामगिताचार्य बंडोपंत बोढेकर यांनी  केले. 
मालदूगी येथे आयोजित गुरुदेव सेवा मंडळ स्थापना व सामुदायिक प्रार्थनेच्या कार्यक्रमात ते उद्घाटक म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी डाॅ.शिवनाथ कुंभारे तर प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य पंडीत पुडके, पुरुषोत्तम कुळमेथे, सुखदेव वेठे, सरपंच यशवंत चौरीकर, उपसरपंच शितल मडावी, यशोधरा नंदेश्वर, ऋषी सहारे, जयदेव कुथे, नाकाडे गुरुजी, कवाडकर, ग्रा.पं सदस्य अन्नाजी नैताम, गुलाब औरासे, दर्शना राऊत, मिराबाई कोडापे, दयमंती चौरीकर, सुरेखा सहारे, आरती ऊईके, वनिता राऊत, टेमकूजी नैताम यांची उपस्थिती होती.
 मुख्यमंत्री ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान अंतर्गत मालदूगी गावाची निवड करण्यात आली आहे. सर्वधर्मसमभावातून गावाची प्रगतीकडे वाटचाल व्हावी यासाठी गुरुदेव सेवा मंडळाची भुमिका मोठी असल्याचे मत सरपंच यशवंत चौरीकर यांनी प्रास्ताविकातून मांडले. अध्यक्षस्थानाहून बोलतांना डाॅ.शिवनाथ कुंभारे यांनी सामुदायिक प्रार्थनेचे महत्व पटवून देतांना भ्रष्टाचारमुक्त समाज निर्मीतीसाठी प्रामाणिकपणाचा अंगिकार करण्यासंबंधी मार्गदर्शन केले. ग्रामविकासात युवकांचा सहभाग वाढावा यासाठी गावातील सुशिक्षीत युवक मुकेश तुलावी, शत्रुघ्न प्रधान, कृष्णा कोल्हे, हेमंत कुथे, मनोज तुलावी, काशीनाथ करंगाम, हसन वरखडे, माहेश्वरी चौरीकर, भारती चौरीकर, भाग्यश्री बनकर, भारती राऊत, अक्षय गाथे यांची 'ग्रामपंचायत दूत' म्हणून निवड करण्यात आली. त्यांचा ग्रामगीता देवून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सामुदायिक प्रार्थनेतून एेक्याची भावना निर्माण होवून शिस्त, शांती व मनावर संस्कार होतात. या सकारात्मक विचारातून  गावात लोकसहभाग दिसून येत आहे. संचालन मुख्यमंत्री ग्राम परिवर्तक अविनाश पोईनकर यांनी केले तर आभार ग्रामसेवक कु.देशमुख यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता राधेश्याम उईके, जितेंद्र खोब्रागडे, ज्ञानेश्वर भोयर यांनी परिश्रम घेतले. राष्ट्रवंदनेने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.  Print


News - Gadchiroli | Posted : 2017-07-23
Related Photos