योग्य अपंग लाभार्थ्यांनाच लाभ मिळण्यासाठी जिल्ह्यात होणार तपासणी


- ऑगस्टच्या पहिल्या आठवडयापर्यंत अहवाल सादर करण्याचे जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांचे निर्देश 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
अपंगासाठी राखून ठेवण्यात आलेल्या ३ टक्के निधीतून प्रत्यक्ष लाभार्थ्याला मदत मिळाली की नाही याची तपासणी करण्यासाठी जिल्हयात तालुकानिहाय पथके नेमून ऑगस्टच्या पहिल्या आठवडयापर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी आज दिले.
  जिल्हास्तरीय अपंग कल्याण समितीची सभा आज जिल्हाधिकारी यांच्या दालनात झाली.  यावेळी अपंग व्यक्तींसाठी असणाऱ्या योजना आणि त्यांची अंमलबजावणी याचा आढावा घेण्यात आला. यावेळी समितीचे सदस्य सचिव सुरेश पेंदाम, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कुत्तीरकर, समाज कल्याणचे विनोद मोहतुरे, सदस्य तथा जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर, शिक्षणाधिकारी एम.एम. चलाख  आदींची प्रमुख उपस्थिती होती.
  जिल्हयात असणाऱ्या विविध यंत्रणांनी ३ टक्के निधी हा अपंगासाठी खर्च करण्याचे निर्देश आहेत. याचे पालन करताना प्रत्यक्ष लाभार्थी व्यक्तीला आवश्यक बाबनिहाय मदत दिली की नाही याच्या नोंदीत तफावत आढळते या पार्श्वभूमीवर १२ तालुक्यांमध्ये प्रत्येकी १० ग्रामपंचायतीत प्रत्यक्ष पहाणी करण्याचा निर्णय यावेळी यावेळी घेण्यात आला.  या पथकात तालुक्याचे तहसीलदार , सहाय्यक गटविकास अधिकारी आणि पंचायत समितीमधील  लेखा सहाय्यक यांच्या समावेश असेल.
 सन २०११ च्या जनगणनेनुसार जिल्हयात ४५६ ग्रामपंचायतींमध्ये ८ हजार १८० अपंगांची संख्या आहे. या सर्वांना त्यांच्या गरजेची वस्तू दिली जाणे अपेक्षित आहे.  मात्र वाटप झालेल्या वस्तू व इतर अखर्चित व खर्चित निधी यांचा अभ्यास होणे आवश्यक आहे.  या दृष्टीकोणातून हा निर्णय आज घेण्यात आला. 
 समितीवर असणाऱ्या अशासकीय सदस्यांनी यावेळी अनुशेषाचा मुद्दा मांडला.  प्राप्त उमेदवार निहाय तसेच पदोन्नतीमधून अनुशेष भरण्यात येईल असे सभेत आज सांगण्यात आले. बस पासेस संदर्भात आज दिनांकापर्यंतची कार्यवाही  जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकाऱ्यांनी केली.  यापुढील कार्यवाही जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या मार्फत व्हावी असाही निर्णय याप्रसंगी घेण्यात आला. मतिमंद व्यक्तीचे पालकत्व स्विकारण्याची  विनंती करणारे २ अर्ज आज समिती सभेत सादर करण्यात आले.  त्याला अध्यक्षांच्या संमंतीने मान्यता प्रदान करण्यात आली.  Print


News - Gadchiroli | Posted : 2017-07-15
Related Photos