स्कूल बॅग न मिळाल्याने ‘त्या’ ने लावला गळफास!


- १३  वर्षीय विद्यार्थ्यांचा करूण अंत
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
नरेंद्र सोनारकर/ नागपूर :
शेतकर्यांच्या व्यथा - वेदनांवर फुंकर घालण्याचे काम शासनाकडून होत असले तरी राब - राब राबणारा शेतकरी जन्मोजन्मीचे पाप फेडतोय काय? असा यक्ष प्रश्न उभा ठाकतो आणि हा प्रश्नप्रपंच प्रश्नांची श्रृंखला निर्माण करतो. त्यातलाच एक प्रश्न म्हणजे, खरच त्या शेतकऱ्याजवळ आपल्या मुलासाठी स्कूल बॅग घ्यायला दोनशे रूपये नव्हते ? त्या दोनशे रूपयांसाठी त्यांना आपल्या लाडक्या आणि एकुलत्या एका मुलाचा बळी द्यावा लागला ? होय! बळीच गेला शिवमचा.
‘त्या’ ने आपल्या वडीलांना ३ दिवसांपूर्वी स्कूल बॅग घेवून देण्याचा आग्रह केला. मात्र शेतात पेरणीचे काम चालु असल्याने शिवमला स्कूल बॅग घेवून देवू शकले नाही. शिवम ने स्कूल बॅग घेवून न दिल्यास गळफास लावणार असा इशाराही आपल्या वडीलांना दिला होता. पण, खरंच शिवम असे काही करेल, कुणालाही वाटलं नव्हतं.
सवनेर - नागपूर मार्गावरील मालेगाव टाकडी येथील रविवार दुपारची ही घटना. मृतक शिवम राजेश कोहळे हा गावातीलच प्रकाश विद्यालयात सातव्या वर्गात शिक्षण घेत होता. आपल्या मित्रांकडे असलेल्या नवीन स्कूल बॅग बघून त्यानेही स्कूल बॅगची मागणी आपल्या वडीलांकडे केली. शिवमला तीन मोठ्या बहिणी असून कोहळे कुटूंबातील शिवम हा एकुलता एक मुलगा होता. रविवारी सकाळी आई - वडील शेतावर गेले. शिवम आपल्या बहिणींसोबत घरीच होता. त्याने आपल्या बहिणींची नजर चुकवून घराच्या सज्ज्यावर जावून स्वतःला गळफास लावून घेतला. बर्याच वेळापासून शिवम दिसला नाही. त्याचा घरातच शोध घेतल्यानंतर शिवम गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आला. मृतदेह लटकलेला दिसताच बहिणींनी टाहो फोडला. गावकरी जमले, आई - वडीलही शेतातून आले. अख्खे गावच अश्रुंच्या सागरात बुडाला. आई - वडीलांचे काय हाल झाले असतील ? एकुणला एक मुलगा स्कूल बॅग घेवून दिली नाही म्हणून कायमचा त्यांच्यापासून दूर निघून गेला. पोलिसांनी पंचनामा करून शिवमचे शव ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविले. शिवमच्या आत्महत्येने मात्र परिसरातील गावांमध्येही शोक पसरला आहे.  Print


News - Nagpur | Posted : 2017-07-10
Related Photos