अरेरे ! ही नगर परिषद की, तलाव!


-  गडचिरोली नगर परिषदेच्या आवारात साचले अर्धा फुट पाणी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
स्थानिक नगर परिषदेत एकहाती सत्ता असूनही शहरात अनेक सोयी - सुविधांचा अभाव आहे. खुद्द नगर परिषदच अनेक समस्यांच्या गर्तेत असून आज आलेल्या पावसामुळे नगर परिषदेच्या आवारात अर्धा फुट पाणी साचले होते. यामुळे नागरिकांना अरेरे ! ही नगर परिषद आहे की तलाव, असे म्हणण्याची पाळी आली आहे.
गडचिरोली नगर परिषदेचा कारभार सुरू असलेल्या इमारतीसमोरील परिसर थोड्याशाही पावसात अनेकदा जलमय होतो. मात्र आजपर्यंत कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. यामुळे कामकाजानिमित्त आलेल्या नागरिकांना पावसाच्या पाण्यातूनच मार्गक्रमण करीत नगर परिषदेत जावे लागते. आज १२ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ४.३०  वाजताच्या सुमारास पावसाने झोडपून काढले. यावेळी काही कळायच्या आतच नगर परिषदेचे आवार तुडूंब भरले. यामुळे तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते. यामुळे नगर परिषदेतच अशी स्थिती आहे तर शहरातील अन्य ठिकाणी काय परिस्थिती असेल, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शहरातील अनेक भागामध्ये नाल्यांचे बांधकाम करण्यात आलेले नाही. काही भागातील नाल्यांचा उपसा वेळेवर होत नाही. यामुळे नाल्या तुंबल्या आहेत. एखाद्यावेळी मोठा पाउस आला की, तुंबलेल्या नाल्यांमुळे पाणी नागरिकांच्या घरात, अंगणात शिरत असते. यामुळे घाण पसरून नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. आता नगर परिषदेमध्ये पाणी साचून तलावसदृश्य परिस्थिती निर्माण होत असल्यामुळे नागरिकांनी शहरातील परिस्थिती काय असेल, याचा अंदाज व्यक्त केला आहे.  

   Print


News - Gadchiroli | Posted : 2017-10-12
Related Photos