साहसिक क्रीडा प्रकारांना चालना देण्यासाठी किटाडीत होणार साहस प्रशिक्षण केंद्र


-  जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करण्यास जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली
: साहसिक क्रीडा प्रकारांना चालना देण्यासाठी किटाडी या गावाजवळ असलेल्या दगडी पहाडीवर केंद्र बनविण्यात यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी दिल्या आहेत.  या ठिकाणी सुंदर असे गिर्यारोहण प्रशिक्षण केंद्र होवू  शकते असेही ते म्हणाले. 
या ठिकाणाची पहाणी जिल्हाधिकारी नायक यांनी केली.  याप्रसंगी जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर, क्रीडा प्रशिक्षक संदीप पेद्दापल्ली आदींची उपस्थिती होती.  गडचिरोलीपासून साधारण २५ किलोमीटर अंतरावर नागपूरकडे जाताना रस्त्याच्या उजव्या बाजूला ही मोठी भव्य अशी पहाडी आहे.  या रस्त्याच्या डाव्या बाजूला  नुकतेच पोलिस दलाचे  प्रशिक्षण केंद्र सुरु झालेले आहे.  
गिर्यारोहणाची आवड असणारे विद्यार्थी आणि युवक सध्या अशा प्रकारच्या प्रशिक्षणासाठी नागपूरमध्ये जातात.  तेथेही कृत्रिम पध्दतीने भिंतीवरील खुंटयांच्या आधारे प्रशिक्षण दिले जाते.   येथील साहसी खेळाच्या प्रसारासाठी किटाडी मैलाचा दगड ठरणार आहे. 
सदर पहाडी गिर्यारोहण  तसेच  रॅपलिंगसाठी अतिशय उत्तम अशी जागा आहे.  याठिकाणी पर्वतारोहण  प्रशिक्षण देणे सहजशक्य आहे.  याच भूमिकेतून या जागेवर या स्वरुपाच्या केंद्राचा विकास करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करुन देण्यास जिल्हाधिकारी नायक यांनी मान्यता दिली आहे.  
याच्या दुसऱ्या बाजूला पोलिसांचे प्रशिक्षण केंद्र आहे.  याचा लाभ पोलिस जवानांना देखील मोठया प्रमाणावर होणार असल्याने पोलिस दलाची देखील याला साथ प्राप्त होणार आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2017-10-12
Related Photos