उद्यापासून गडचिरोली शहर होणार डुक्करमुक्त : अनिल कुनघाडकर


- वाशिम जिल्ह्यातील डुुक्कर पकडणारे पथक दाखल
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
शहरात मोकाट डुकरांचा हैदोस वाढला असून नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत नगर परिषदेच्या वतीने डुक्करांना पकडण्याची मोहिम राबविली जाणार आहे. उद्या १३ आॅक्टोबर रोजी सकाळपासूनच मोकाट डुक्करे पकडण्यास प्रारंभ होणार आहे. वाशिम जिल्ह्यातील एक पथक गडचिरोलीत दाखल झाले असून गडचिरोली शहर उद्यापासून डुक्करमुक्त होणार असल्याची माहिती नगर परिषद उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर यांनी दिली आहे. 
मागिल अनेक दिवसांपासून गडचिरोली शहरात  मोकाट डुकरांचा उपद्व्याप वाढला आहे. गल्लोगल्लीत डुकरे कळपाने फिरत असतात. घाणीच्या ठिकाणी गोळा होवून प्रचंड प्रमाणात घाण पसरवितांना दिसून येतात. मुख्य मार्गानेसुध्दा ही डुक्करे फिरत असतात. यामुळे अनेकदा वाहनांचे अपघात घडले आहेत. रात्री - अपरात्री डुकरे नागरिकांच्या घराशेजारी, गल्ली बोळात फिरून घाण पसरवितात. याबाबत नगर परिषदेकडे अनेकदा नागरिकांनी तक्रारी केल्या. नगर परिषदेच्या वतीने डुक्कर मालकांना नोटीस देऊन बंदोबस्त करण्यास बजाविण्यात आले होते. ५  सप्टेंबर रोजी तसेच ६  आॅक्टोबर रोजी मोकाट डुक्करांच्या मालकांना नोटीस बजावली होती. तसेच लाउडस्पीकरच्या माध्यमातून आवाहनसुध्दा करण्यात आले होते. मात्र डुक्करमालकांकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने वृत्तपत्रातून जाहिरात प्रसिध्द करून डुक्करे पकडण्यासाठी पथक बोलाविण्यात आले आहे. दहा जणांचे पथक उद्या १३ आॅक्टोबर रोजी सकाळपासूनच मोहिम सुरू करणार आहेत. यावेळी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला जाणार आहे, अशी माहिती नगर परिषद उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर यांनी विदर्भ न्यूज एक्सप्रेसशी बोलताना दिली.
   Print


News - Gadchiroli | Posted : 2017-10-12
Related Photos