वर्धा नदीत कचऱ्याचा थर, स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
जिल्हा प्रतिनिधी / वर्धा :
यंदा पुरेशा पावसाअभावी वर्धा नदीच्या पात्रातून पाणी वाहिले नसल्याने साचलेल्या पाण्यावर निर्माल्य व प्लास्टिकचा थर साचल्याने पाणी प्रदूषित झाले आहे. परिणामी वर्धा नदीत  स्वच्छता मोहिमे बाबत शासनाने विचार करण्याची गरज नगरवासियांकडून व्यक्त होत आहे. 
वर्धा नदीवर गुंजरवेडा शिवारात लाखो रुपये खर्चून बंधारा बांधण्याचे काम वेगात सुरु आहे . त्यामुळे रेल्वे पुलानजीक पाणी अडविण्यात आल्याने उत्तरेकडून वळण घेत असलेल्या पाण्याचा प्रवाह थांबला आहे. त्यातच या वर्षी पावसाच्या हंगामात जोरदार पाऊस पडला नाही. गेल्या काही वर्षात नदीला पूर न येण्याची ही  पहिली वेळ आहे. दरवर्षी नदीला पूर येतो. पण यावर्षी पावसाचे पाणी साचले आहे . परिणामी साचलेल्या पाण्याची दुर्गंधी पसरली आहे.  नदीकाठच्या वस्तीतील लोकांना त्रास सहन करावा लागतो. पुलगाव आणि ग्रामीण भागातील धार्मिक कार्यक्रमाचे हारतुरे, पाला, पाचोळा, सार्वजनिक उत्सवप्रसंगी, पंगतीत वापरलेली प्लास्टिक पालापाचोळा , ग्लास , द्रोण, प्लास्टर ऑफ पॅरिसने बनलेल्या देव देवतांच्या विसर्जित मुर्त्यांचा खच नदीच्या पाण्यात साचला आहे. काही भागात नदीवर दुरवर थर असून पाणी दिसत नाही. इतकी भयावह स्थिती आहे. असे दूषित पाणी शुद्धीकरण करून नळाद्वारे पुरविले जाते. तरी सुद्धा आजार बळावत असल्याची भीती नगरवासियांतून बोलले जाते. केंद्र शासन गंगानदी शुद्धीकरण अभियानावर कोट्यवधी रुपये खर्च करत आहे. त्या धर्तीवर वर्धा नदी शुद्धीकरणाकडे लक्ष द्यावे असे नागरिकांचे म्हणणे आहे.   Print


News - Wardha | Posted : 2017-10-12
Related Photos