निसर्गाच्या सानिध्यात वसलेले साठगावचे 'श्री दत्त मंदिर'


विदर्भ न्यूज एक्सप्रेस '
सुनील कोडापे / शंकरपूर : 
चंद्रपूर, भंडारा व नागपूर जिल्ह्याच्या सीमेवर वसलेले छोट्स गांव साठगाव. चिमूर-कान्पा-नागपूर मार्गावरील शंकरपूर, कान्पा, भुयार व भिवापूर वरून ७ ते ८ कि. मी. वर आड बाजूस असलेले गाव.चारगाव, पाचगाव, शेगाव, तसे हे साठगाव, एकेकाळी साठ घराची वस्ती असलेलं आणि  आता जवळपास २००० लोकसंख्या असणारं हे गाव आज आपल्या निसर्ग रम्यतेने आकर्षणाचे केंद्र बनले आहे. त्यातल्या त्यात गावाच्या दक्षिण टोकाला टेकडीवर उभे असलेले श्री दत्त प्रभूचे भव्य मंदिर या निसर्ग रम्य परिसरात अधिकच भर घालत आहे.
  चिमूर तालुक्यातील या साठगाव आता अस्तित्वात असलेल्या या भव्य मंदिराच्या जागी पूर्वी श्री दत्त यांच्या पाषानमुर्तीचे झोपडीवजा मंदिर होते अशी आख्यायिका आहे. मंदिराची स्थापना १८८६ मध्ये झाली असावी. याबाबत थोडक्यात असे कि श्री दत्त प्रभूचे मुख्य स्थान माहूर येथून ‘ माहुरची वारी ' येत असे. अशाच एका क्षणी वारी येथे आली असता साठगाव येथिल एका टेकडीवर एक काळी पाषाण प्रतिमा. ( या प्रतिमेबद्दल काही दंत कथा मिळतात पूर्वी माहुरची वारी खाचर बैलाने होत असे . मुकाम करीत जावे लागत असे माहूरच्या वारीवरून परत येत असताना हा पाषाण बैलाच्या खुरीत आला तर एक मते खाचराच्या चाकात आला .) त्या वेळचे मालगुजार कवडू धर्माजीपाटील गावंडे यांनी हे भव्य मंदिर उभारले व त्यात सापडलेल्या पाषाण प्रतिमेची प्रतिष्ठापना केली. या कामी त्यांना आपली आई राधाबाई यांचेही सक्रीय सहकार्य लाभले. मंदिराच्या उभारणीसाठी खास पवनी येथून कारागीर मागविण्यात आले होते. मंदिराची कल्पकता व भव्य वास्तू पाहता हे कार्य पवनी च्या कारागीरांच्या हातून घडले असावे यावर प्रथमदर्शनी विश्वासच बसत नाही. सदर मंदिर चुनखडी मिश्रित विटांनी बांधलेले असून श्री दत्ताच्या पाषाण प्रतिमेवर एकमुखी चांदीचा मुखवटा बसविला आहे. अत्यंत वेधक कलाकुसरयुक्त बघत राहावे असा हा मुखवटा शंकरपूर येथिल सोनाराने तयार केला. हे ऐकून तर विश्वास बसत नव्हता. एका लहानशा खेडयात इतकी सुंदर कारागिरी हे एक आश्चर्य वाटावयास लागले. तसेच त्या मंदिरातील दुसरा कारागिरीचा नमुना म्हणजे श्री दत्त प्रभूचा लाकडी रथ, त्या वेळेस साठगाव येथिल वाढई समाजाच्या कै. राखुंडे कुटुंबीयांनी तयार केलेला लाकडी रथ असून रथावरील नक्षीकाम हे उत्कृष्ठ कला आजही ग्रामीण भागातील कलाकसुरीचा एक नमुना आहे. मंदिराच्या आजूबाजूला हिरवीगार शेती नि नयनरम्य निसर्ग दर्शन आहे. याच रथावर (दत्त जयंती) मार्गशिर्ष पौर्णिमेला श्री दत्तप्रभुच्या मूर्तीची स्थापना करुन गावात दिंड्या भजना सह रथ शोभायात्रा काढण्यात येते तर दुस-या दिवशी (प्रवचन, किर्तन, दहीहांडी, गोपालकाला व महाप्रसाद) भव्य यात्रा असते.
 साठगावातील या दत्त प्रभूची महिमा चंद्रपूर,भंडारा, नागपूर,वर्धा व गडचिरोली या जिल्ह्यात असून दर पौर्णिमेला बहू संख्येने भाविक येथे येत असतात. सर्व गावकरी तथा परीसरातील भावीक मंडळीच्या अपार श्रद्धा व स्नेहाने स्व. कवडूजी पाटील गावंडे (कै.कवीश्वरदादा दर्यापूरकर) यांचे कुटुंबीय महाऩुभाव श्री दत्त मंदिर येथिल श्रीदत्त जयंती उत्सव आजही मोठ्या उत्साहाने साजरा करतात .   Print


News - Chandrapur | Posted : 2017-10-06
Related Photos