चंद्रपूरची वृक्षलागवड देशाला दिशादर्शक ठरणार : ना. मुनगंटीवार


- वनमहोत्सवात पालकमंत्र्यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद
- दुसऱ्या  दिवशी जिल्हयात १० लाखावर वृक्ष लावगड
- ४० लाख विक्रमी वृक्षलागवडीसाठी वनविभागाचे प्रयत्न
 विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर :
वनाबद्दलच्या प्रेमातून वृक्षलागवडीच्या संकल्पाला सुरुवात झाली. गेल्यावर्षी केवळ प्रयोग केला पण आतामात्र ५० कोटी हे मिशन झाले असून हे व्रतपूर्ण करतांना चंद्रपूरच्या जनतेने विक्रमी वृक्षलागवड करुन दरवर्षी मला काम करायला प्रोत्साहीत केले आहे. या ऋणातून उतराई होणे शक्य नाही. मात्र आत्मियतेने तुम्ही लावलेली वृक्ष देशाला दिशादर्शक ठरेल, असे प्रतिपादन वित्त, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे केले.
शनिवारी ऐरोली येथे वनमहोत्सव २०१७ चे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर या कामासाठी ज्या प्रदेशाने त्यांना प्रेरणा दिली, त्‍या त्यांच्या चंद्रपूर जिल्हयात वनमहोत्सवाच्या मुख्य कार्यक्रमात ते रविवारी सहभागी झाले होते. शाळकरी विद्यार्थ्यांच्या विक्रमी उपस्थितीत प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात वृक्षलागवड करण्यात आली. वनमहोत्सवाच्या दुसऱ्याच  दिवशी वनविभागाच्या अधिकृत आकडेवारीनुसार चंद्रपूर जिल्हयाने १० लक्ष २० हजार ९२ वृक्षांची सायंकाळी ६ वाजेपर्यंत नोंद झाली.  या १० लक्ष वृक्षलागवडीची वाटचाल ही विक्रमाकडे होत असून चंद्रपूर जिल्हा सर्वाधिक वृक्षलागवड करणारा जिल्हा, असेल अशी खात्री त्यांनी व्यक्त केली. चंद्रपूर जिल्हयाने माझ्या प्रत्येक मोहिमेला भरभरुन पाठबळ दिले असून आज तर विद्यार्थी सुध्दा मोठया संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल त्यांनी भावनिक होत आभार मानले. यावेळी त्यांनी तुमचे माझ्यावरचे प्रेम व्यर्थ जाणार नाही. ५० कोटी वृक्षलागवडीच्या माध्यमातून महाराष्ट्र विक्रम करेल, महाराष्ट्र धन में भी ओर  वन मे भी आगे रहेगा, असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी व्यासपिठावर केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, महानगरपालिकेच्या महापौर अंजली घोटेकर, आमदार नाना शामकुळे, बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरीष शर्मा, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, मुख्य वनसंरक्षक विजय शेळके आणि वृक्षलागवडीच्या चळवळीत झोकून देणा-या  ना.मुनगंटीवार यांच्या पत्नी सपनाताई मुनगंटीवार उपस्थित होत्या. सेंट मायकल शाळेतील शेकडो विद्यार्थी व चंद्रपूरातील मान्यवरांच्या उपस्थितीत वनमंत्र्यांनी आज वृक्षारोपन केले.
तासभर चाललेल्या शिस्तबध्द वृक्षारोपनानंतर उपस्थित जनसमुदयाला संबोधित करतांना त्यांनी चंद्रपूर जिल्हयात वनविभाग, वनविकास महामंडळ व सामाजिक वनीकरण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी  केवळ शासकीय काम न समजता सुरु केलेल्या वृक्षलागवडीने आपण दिपून गेल्याचे स्पष्ट केले. वसुंधरेला हीरवाकंच्च करण्याचा आपला संकल्प हे पुण्याचे काम आहे. केवळ शासकीय काम न समजता अधिकारी, कर्मचा-यांनी झोकून देत यावेळी नियोजन केले असून त्यांच्यामुळेच जिल्हा विक्रमी वृक्षलागवडीकडे वाटचाल करीत असल्याचे त्यांनी सांगितले. दुस-याच दिवशी ४ वाजेपर्यंत राज्यामध्ये १ कोटी २९ लक्ष वृक्षलागवड झाल्याचे चित्र असून पुढील सहा दिवसात हा आकडा ४ कोटीच्या पलिकडे जाईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. महाराष्ट्रात वृक्षलागवडीची मोहीम असून ज्याच्याकडे जागा नाही त्या पुणेकरांनी सिडबॉल तयार करुन जंगलामध्ये वृक्षवृध्दीला हातभार लावला आहे. सिनेसृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासह संपूर्ण सिनेसृष्टी या जनउपयोगी कार्यात सहभागी झाली आहे. शेकडो लोक रोज हरीत सेनेचे सदस्य बनत आहे.  हरीत सेनेची (ग्रीन आर्मी) संख्या येत्या काळात एक कोटीपर्यंत नेण्याचा संकल्पही त्यांनी यावेळी जाहिर केला.
यावेळी विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला. काल ऐरोलीमध्ये अंध विद्यार्थ्यांनी देखील पुढच्या जन्माच्या हिरवाईसाठी वृक्षलावगड केल्याचे सांगितले. अंपगांनी झाड मला बैसाखी देते, मी झाड का लावू शकत नाही, असा प्रश्न केला. शेकडो स्वयंसेवी संस्था विनाअट या सामाजिक कार्यात पुढे येत आहे. त्यामुळे विद्यार्थी तरुणांनी या मोहिमेत मोठया संख्येने सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी देखील वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सुक्ष्म नियोजनातून वनमहोत्सव यशस्वी होईल असे स्पष्ट केले.  मुख्य वनसंरक्षक विजय शेळके यांनी यावेळी वनविभागाच्या वेबसाईडवर जाऊन वृक्षलागवडीच्या संदर्भातील माहिती घ्यावी, असे विद्यार्थ्यांना आवाहन केले. या ठिकाणी दर मिनीटाला माहिती अपलोड होत असून चंद्रपूरमध्ये वनविभागाने एकटयाने सायंकाळपर्यंत ७  लाख ७८ हजार ५३९ वृक्षलागवड केल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी वनमंत्र्यांनी २९ लाखाचे उद्दिष्ट दिले असले तरी हा जिल्हा विक्रमी ४० लाखांच्या वृक्षलागवडीकडे वाटचाल करीत असल्याचे सुतोवाच त्यांनी केले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे मानले आभार
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या गेल्यावर्षीच्या वृक्षलागवडीचे मन की बात मध्ये कौतुक करणारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यावर्षी देखील मुनगंटीवार यांच्या चार कोटी वृक्षलागवडीच्या मोहिमेचे व्टिट करुन कौतुक केले आहे. ही कौतुकाची थाप मुनगंटीवार यांनी आपल्या गृह जिल्हयातील जनतेपुढे सांगितली. प्रधानमंत्र्यांच्या शाबासकीने आपणास काम करण्याचे बळ मिळाले असून याचे सर्वश्रेय चंद्रपूरच्या  जनतेला जाते, असे त्यांनी सांगितले. चंद्रपूर ग्रामीण भागातील कामगारांनी तयार केलेला सहा फुटाचा तिरंगा ध्वज प्रधानमंत्र्यांना दिला असून चंद्रपूरची ही भेट नवी दिल्लीच्या कार्यालयात डौलाने उभी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.    Print


News - Chandrapur | Posted : 2017-07-02
Related Photos