मुलाखत : स्त्री शक्ती - १ योगिता पिपरे, नगराध्यक्षा न. प. गडचिरोली


राजकारणात येईन असं वाटलं नव्हतं मात्र सर्वांचा आग्रह होता आणि लहानपणापासून राजकारण बघितलेलं होतं  त्यामुळे मी या क्षेत्रात आले.  आता या पदावर काम करताना लोकांसाठी आपण चांगलं काम करु शकतो याचा आत्मविश्वास आहे आणि त्याबाबत आत्मिक समाधान वाटते. गडचिरोलीच्या नगराध्यक्षा योगिता पिपरे आपले अनुभव सांगत होत्या. 

 नवरात्र अर्थात स्त्री शक्तीचा उत्सव या निमित्त विविध क्षेत्रातील यशस्वी महिलांशी संवाद साधण्याचा उपक्रम जिल्हा माहिती कार्यालयाने हाती घेतला आहे.  या अंतर्गत योगिता पिपरे यांच्याशी नगरपालिका कार्यालयातील त्यांच्या कक्षात बातचित केली त्यावेळी त्यांनी आपला राजकारणातला अनुभव कथन केला. 

माझं मुळ गाव वर्धा जिल्हयातील जामनी.  या गावात माझे आजोबा दमडुजी तानबाजी गव्हाळे  हे २५  वर्ष सरपंच होते.  त्यामुळे घरात राजकारण हे लहानपणापासून बघितले.  माझं शिक्षण वर्ध्यातील केसरीमल कन्या शाळेत झालं. 

२०  जून १९९५  साली प्रमोद पिपरे यांच्या सोबत विवाह झाला.  त्यावेळी ते देखील सक्रीय राजकारणात होते.  त्यामुळे सासर-माहेर असं दोन्ही घरी माणसांची गर्दी, राजकारणावरील चर्चा असं वातावरण कायम राहीलं.  असं वातावरण असलं तरी मी स्वत: राजकारणात उतरेल असं मला वाटलं नाही असं त्या म्हणाल्या.  देशात आपल्या राज्यात सर्वप्रथम राजकीय क्षेत्रात महिलांना आरक्षण मिळालं त्याचवेळी गडचिरोलीचे नगराध्यक्षपद  महिलांसाठी राखीव झालं. कुटुंबासोबत माझ्या मैत्रीणींनी मला निवडणूक लढवण्याचा सल्ला दिला आणि प्रथमच निवडणूक लढवून मला यशही मिळालं. 

समाजासाठी चांगलं काम करण्याची संधी म्हणून  मी या पदाकडे बघते.  गडचिरोलीत ९२.८५  कोटी रुपयांची भुमीगत गटार योजना मंजूर करुन घेण्यात यश मिळालय.  आता घनकचरा व्यवस्थापन त्यातून एका बाजूला गांडूळखत निर्मिती व दुसऱ्या बाजूला उर्जा निर्मितीसाठी  प्रयत्न सुरु केले आहेत.  आपल्या कामांबाबत बोलताना उत्साह आणि आत्मविश्वास त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे जाणवत होता. 

शहरात स्वच्छतेला प्राधान्य आपण दिले आहे. हागणदारी मुक्ती योजनेतून नागरिकांचे आरोग्य जपण्याचा प्रयत्न आपण केला.  त्याला आता यश आले आहे. जिल्हास्तर समिती आणि राज्य समितीने गडचिरोलीत झालेल्या कामाची वाखाणणी केली असून आता हे उल्लेखनीय काम बघण्यासाठी  केंद्रीय पथक २ ऑक्टोंबरला येणार हे मोठे यश आहे, असे मी मानते. 

शहराला सांस्कृतिक वारसा फारसा नाही.  मात्र जिल्हयात झाडीपट्टी रंगभूमीला १५० वर्षांचा इतिहास आहे.  या कलावंतांना वर्षभर रंगमंच उपलब्ध असावा या भुमिकेतून शहरात २०  कोटी रुपये खर्च करुन भव्य असे नाटयगृह उभारण्याचा प्रयत्न शासनाकडे आपण पाठवला आहे.  या साठी नगरपालिकेने स्वत:ची जागा देऊ केली आहे. 

बोलताना सहाजिकच घर आणि राजकारण हा तोल कसा सांभाळला जातो हा विषय आला.  मुलगा अनुराग हा अभियांत्रिकीचे शिक्षण घेतोय.  तर कन्या दर्शिता १२  व्या वर्गात शिकतेय.  मी शहरासाठी  नगराध्यक्ष असले तरी मुलांसाठी मात्र आईच आहे.  मुलांना त्यासाठीचा वेळ द्यावाच असा माझा आग्रह असतो आणि मी ते  पाळते देखील.  बोलतांना  " स्त्री " मधील कर्तुत्वासोबतच मातृत्व असा संयोग स्पष्टपणे जाणवत होता. 

मुलाखत संपत असताना येणाऱ्या कार्यकर्त्यांनी दालन भरायला सुरुवात झाली होती.  २५  वर्ष सक्रीय राजकारणाचा संसार सांभाळणारे त्यांचे पती प्रमोद पिपरे यांनीही या संवादात  सहभाग घेतला.  त्यांच्या पुढील कारकिर्दीला सदिच्छा देत मग मी देखील पुढच्या मुलाखतीसाठी रवाना झालो.  

मुलाखत व शब्दांकन

- प्रशांत दैठणकर   9823199466  Print


News - Mulakhat | Posted : 2017-09-21
Related Photos