चंद्रपूर व गडचिरोली जिल्हयात डिजिटल इंडियाची संकल्पना प्रभावीपणे राबवावी : ना. हंसराज अहीर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
जिल्हा प्रतिनिधी / चंद्रपूर :
 चंद्रपूर  जिल्हा औद्योगिकदृष्ट्या विकासाभिमुख असल्याने तसेच गडचिरोली हा दुर्गम, वनाच्छादीत व नक्षलग्रस्त असल्याने डिजिटल इंडियाची संकल्पना या दोन्ही जिल्हयात राबविण्याचा प्रयत्न भारत संचार निगम च्या माध्यमातून अधिकाऱ्यांनी करावा असे निर्देश देतांना नक्षलप्रभावित आदिवासी जिल्हयात संवाद प्रक्रीयेत सुलभता व प्रभावीपणा येण्याकरिता संवाद प्रक्रीयेतील अडचणींचा अभ्यास करून दूरसंचार विभागाने या अडचणी दूर करण्यासाठी   धोरणात्मक उपाययोजना अमलात आणाव्यात असे निर्देश भारत संचार निगमच्या विकास विषयक आढावा बैठकीत संबोधित करतांना केंद्रीय गृह राज्यमंत्री  हंसराज अहीर यांनी दिले. 
 केंद्रीय गृह राज्यमंत्री  ना. अहीर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत भारत संचार निगम, चंद्रपूरचे   महाप्रबंधक अरविंद पाटील तसेच केंद्रीय राखीव पोलीस दलाचे उप महानिरीक्षक  टी.शेखर यांची विशेष उपस्थिती होती. या बैठकीस वणीचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, उपमहाप्रबंधक कोजबे, जेटीओ मोबाईल व अन्य सेक्शनचे अधिकारी, कर्मचारी  उपस्थित होते.  महाप्रबंधकांनी ना. अहिर यांना चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील बीएसएनएल सेवेशी संबंधित अद्ययावत माहितीचा गोषवारा सादर केला. ना. अहीर यांनी बीएसएनएल सेवेबद्दल ग्राहकांच्या सातत्याने तक्रारी वाढत असल्याने या तक्रारींची गांभीर्याने दखल घेण्याची सुचना केली.
 केंद्रीय गृह राज्यमंत्री  ना. अहीर यांनी गडचिरोली जिल्हयातील बीएसएनएल सेवा अधिक प्रभावीपणे कार्यान्वित होईल या अनुशंगाने कार्यवाही करावी, नेटवर्कच्या बाबतीत वारंवार अडचणी उद्भवणार नाही याबद्दल विशेष गांभीर्य बाळगावे व त्या अडचणीच्या निवारणाकरिता नवीन मोबाईल टाॅवर्सची उभारणी आवश्यकतेनुसार करण्याच्या दिशेने पावले उचलावीत अशी सुचना केली. 
 गडचिरोली जिल्हयातील नक्षलविरोधी अभियान मोहिम, केंद्रीय रिजर्व पोलीस दल व महाराष्ट्र पोलीस सयुक्तपणे राबवित असल्याने त्यांचा मुख्यालयाशी होणारा संवाद विनाअडथळा व्हावा व संकटकालीन समयी संदेशवहन प्रभावीपणे होण्याकरिता बीएसएनएल ने आवश्यक त्या उपाययोजना करून ही सेवा सक्षम करण्यावर भर द्यावा असे सांगितले. 
 डिजिटल इंडिया मध्ये औद्योगिकदृष्टया प्रगत व अधिक लोकसंख्या असलेल्या तालुक्यांचा समावेश करण्यासंबंधात आराखडा तयार करण्याचे तसेच ज्या ठिकाणी  २ जी सेवा कार्यान्वित आहे त्या ऐवजी ३  जी व आवश्यकतेनुरूप ४ जी सेवा उपलब्ध करून देण्याचे धोरण स्विकारावे असेही ना. अहिर यांनी सुचित केले. संचारसेवेतील स्पर्धेमध्ये भारत संचार निगमने आपले कार्यक्षेत्र वाढवित या सेवेला अधिकाधिक ग्राहकाभिमुख स्वरूप देण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांनी करावा. या बरोबरच ग्राहक  तक्रारींचे तातडीने निवारण होईल या दृष्टीनेही अधिकाऱ्यांनी नियोजन करावे.  ग्रामीण भागात अजुनही कवरेजबाबत बहुतांश तक्रारी  असल्याने ही समस्या सोडविण्यासाठी तसेच बीएसएनएल या शासकीय दुरसंचार सेवेचा लाभ अधिकाधिक  ग्राहक घेतील यासाठी ही सेवा अद्ययावत करण्यासाठी अधिकाऱ्यांनी नियोजन  करावे.  
 चंद्रपूर माध्यमिक स्वीचींग क्षेत्रा (एसएसए) अंतर्गत बल्लारपूर, भद्रावती, चंद्रपूर, राजुरा, कोरपना, वरोरा या कमी अंतरावरील चार्जिंग क्षेत्रात (एसडीसीए) अंतर्भुत तालुक्यातील सर्व एक्सचेंजला फोर जी सेवा त्वरित संलग्न करण्यात यावी तसेच पोंभुर्णा, राजुरा, कोरपना या एक्सचेंज मध्ये इंटरनेट सेवा प्रभावित होत असल्याने शासकीय, निमशासकीय, खासगी कार्यालयातील सेवा विस्कळीत होत असल्याच्या तक्रारी असून या अडचणींमुळे या सर्व तालुक्यातील राष्ट्रीयकृत, जिल्हा व खासगी बॅंका पतसंस्थांचे व्यवहार प्रभावित होत असल्याने या तालुक्याबरोबरच जिल्हयातील अनेक शहरे व ग्रामीण क्षेत्रात इंटरनेट सेवा सक्षमपणे सुरू राहिल या अनुषंगानेही बीएसएनएल ने उपाययोजना कराव्या अशा सुचना यावेळी दिल्या.  
 चंद्रपूर एसएसए अंतर्गत जिल्हयात असलेल्या रिक्त पदांमुळे बीएसएनएल सेवेवर दूरगामी परिणाम होत असून त्याचा फटका ग्राहक सेवेवर तसेच शासकीय कामकाजावर होत असल्याने  नव्याने प्रस्ताव सादर करून मंजूरी प्राप्त करून घ्यावी असेही ना. अहीर यांनी अधिकाऱ्यांना सुचित केले. 

   Print


News - Chandrapur | Posted : 2017-09-20
Related Photos