प्रत्येक जिल्ह्यातील नक्षल सेलने फ्रंटल संघटनांवर लक्ष ठेवावे


- विशेष पोलिस महानिरीक्षक शरद शेलार यांच्या सूचना 
-  नक्षल विरोधी सेलच्या राज्यस्तरीय कार्यशाळेत अधिकारी- कर्मचाऱ्यांना  मार्गदर्शन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर :
जंगलातून शहरी भागात फ्रंटल संघटनांच्या माध्यमातून पसरत चाललेल्या नक्षलवादाला रोखण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील नक्षल सेलने दक्ष रहावे, अशा सुचना नक्षल विरोधी अभियानाचे विशेष पोलिस महानिरीक्षक शरद शेलार यांनी केली.   
नक्षल विरोधी अभियान, महाराष्ट्र राज्य, नागपूरतर्फे अमरावती मार्गावरील सुराबर्डी येथील अपारंपारिक अभियान प्रशिक्षण केंद्र (युओटीसी) येथे ‘नक्षलवाद व शहरी नक्षलवाद’ या विषयावर आयोजित केलेल्या कार्यशाळेत राज्यभरातून उपस्थित झालेल्या अधिकारी-कर्मचा-यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.  
नक्षल विचारसरणी ही माओवादी विचारसरणी झाली असल्याचे सांगून श्री. शेलार म्हणाले की, माओवाद्यांना सामान्य माणसांच्या प्रश्नांशी काहीही घेणे-देणे नसून असंतोषाच्या माध्यमातून आपल्या लोकशाही प्रधान देशाचे तुकडे करण्याची रणनिती आहे. त्यामुळेच जगंली भागातील हा माओवाद शहरी भागात पाय पसरविण्याचा प्रयत्न करीत आहे. प्रत्येक जिल्ह्यातील पोलिस अधिकारी व कर्मचा-यांनी वेळीच सावध होऊन हा धोका ओळखून माओवादाला रोखण्याची गरज आहे. आपण पोलिस म्हणून प्रत्येक जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचे काम पाहत असतो, या समस्येलाही त्याच पध्दतीने हाताळण्याची गरज आहे. राज्यातील अनेक महत्वाच्या शहरात पसरलेल्या या नक्षल समर्थकांवर बारीक लक्ष ठेवून आपल्या भावी पिढीला वेळीच सावध करण्याची गरज आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातील नक्षल सेलमधील अधिकारी व कर्मचा-यांनी आपल्या वरिष्ठांशी, तसेच विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालय, नक्षल विरोधी अभियान यांच्याशी समन्वय साधून कार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.  
या कार्यशाळेत राज्यातील विविध जिल्ह्यातील नक्षल विरोधी सेल व विशेष शाखेचे अधिकारी कर्मचारी यांनी विशेष पोलिस महानिरीक्षक शरद शेलार यांच्याशी संवाद साधून नक्षल सेलमध्ये काम करतांना येणाऱ्या  विविध समस्यांचे निराकरण करून घेतले. यावेळी मंचावर नक्षल विरोधी अभियानाचे पोलिस उपअधिक्षक संजीव म्हैसेकर प्रामुख्याने उपस्थित होते. 

   Print


News - Nagpur | Posted : 2017-09-16
Related Photos