३१ मार्चपर्यंत कामे पूर्ण करण्याचे नियोजन करा : श्यामलाल गोयल


- पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाची आढावा बैठक
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर :
केंद्र आणि राज्य शासन ग्रामीण जनतेला शुद्ध पाणी पुरवण्यासाठी विविध योजनेच्या माध्यमातून प्राधान्य देत आहे. त्यामुळे पाणीपुरवठा करणाऱ्या योजना पूर्ण करा तसेच विभागातील गावे ३१ मार्च २०१८ पर्यंत हागणदरीमुक्त करण्याचे नियोजन करा, अशा सूचना पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयल यांनी दिल्या. येथील विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.  
यावेळी विभागीय आयुक्त अनूप कुमार यांची मुख्य उपस्थिती होती.  
नागपूर विभागात स्वच्छ ग्रामीण भारत मिशनअंतर्गत भौतिक व आर्थिक प्रगती व उर्वरित कामाचे नियोजन, छायाचित्र अपलोडींग सद्यस्थिती, हागणदरीमुक्त ग्रामपंचायत व पडताळणी, स्वच्छता दर्पण पुरस्कार, स्वच्छ ‘ऐ थॉन’ स्पर्धा सहभाग, नादुरुस्त शौचालय प्रगती व निधी खर्चाचा आढावा, माहिती, शिक्षण व संवाद अंतर्गत विविध उपक्रम व झालेला खर्च आणि सन २०१६ -१७ चे उपयोगिता प्रमाणपत्र व  लेखा अहवाल व सन २०१७ - १८ चे प्रमाणपत्र आदि विषयांचा आढावा बैठकीत घेण्यात आला.. 
पाणीपुरवठा व स्वच्छतेबाबत होत असलेल्या कामांच्या प्रगतीवर अपर मुख्य सचिवांनी समाधान व्यक्त केले. संपूर्ण नागपूर विभाग लवकरच हागणदरीमुक्त होईल, असा विश्वास व्यक्त केला.  तसेच हागणदरीमुक्त झालेल्या गावांचे कौतुक करत त्यामध्ये सातत्य टिकविण्याबाबत सूचना दिल्या. 
ग्रामीण भागात नागरिकांना पिण्यासाठी शुद्ध पाणीपुरवठा करणे तसेच स्वच्छता योजना राबविताना त्या  यशस्वी करण्यासाठी लोकसहभाग आवश्यक आहे. लोकसहभाग वाढविण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष क्षेत्रावर लक्ष घालण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. शुद्ध पाण्याचा थेट संबंध हा नागरिकांच्या आरोग्याशी आहे. त्यामुळे पाणी अशुद्ध अथवा प्रदूषित होणार नाही, याची काळजी घेण्याचे निर्देश अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयल यांनी दिले. योजना राबविताना अडचणी येत असतील तर अधिकाऱ्यांनी त्या योजना राबविताना गावांची आणि समस्यांची यादी बनवावी. ते प्रस्ताव मुख्यालयाकडे पाठवावेत. त्यावर उपाययोजना करुन कामे मार्गी लावण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी केंद्र आणि राज्य शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गंत सन २०१७ - १८ या आर्थिक वर्षातील कृती आराखड्याची भौतिक प्रगती, प्रगतीपथावरील योजनांची स्थिती, ३  वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी प्रलंबित योजनांची कारणे, आर्थिक प्रगतीबाबत आढावा घेतला. त्यामध्ये पूर्ण झालेल्या ग्रामीण पाणीपुरवठा योजना, विद्युत जोडणीअभावी प्रलंबित  योजनांचा तपशीलाचा आढावा घेतला. 
प्रत्यक्ष क्षेत्रावर योजना राबविताना काहीही अडचण येणार नाही. त्या राबविताना केंद्र शासनाचा निधी पडून राहणार नाही, याची खबरदारी घ्या. तसेच तो वेळेत खर्ची करण्यासाठी पूर्ण नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. तसेच नागपूर व चंद्रपूर जिल्ह्यात मजीप्राच्या माध्यमातून जलस्वराज्यच्या उपविभागीय स्तरावर प्रयोगशाळा सुरु करण्यासाठी जागांची पाहणी आणि बांधकामाबाबत आढावा घेतला. नागपूर विभागामधील जलस्वराज्य - २ कार्यक्रमातील प्रकल्प राबविण्यासाठी मजीप्राची निवड करण्यात आलेल्या गावे, वस्त्या आणि वाड्याचाही त्यांनी यावेळी आढावा घेतला.
 मुख्यमंत्री ग्रामीण पाणीपुरवठा योजना प्रोत्साहनपर निधी मिळणार आहे, त्यासाठी जनतेमध्ये जनजागृती करण्याविषयी त्यांनी निर्देश दिले. गावात कोणत्याच प्रकारचे प्रदूषण होणार नाही, याची दक्षता घेण्याबाबत ठोस कृती करा. कारण आरोग्याचा पर्यावरणाशी थेट संबंध असल्यामुळे ही खबरदारी घेणे गरजेचे आहे. सद्यस्थितीत सुरु असलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करुन नवीन कामे हाती घेण्याबाबतच्या सूचना अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयल यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.

   Print


News - Nagpur | Posted : 2017-09-12
Related Photos