बल्लारपूरात वाढत आहे बालगुन्हेगारी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
मुन्ना खेडकर / बल्लारपूर :
 चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी होवून दोन वर्ष झाले. या कार्यकाळात पोलिसांनी तब्बल ९८  कोटी रूपयांची अवैध दारू जप्त केली आहे. जिल्हा पोलिस संपूर्ण जिल्ह्यात दारूमुक्ती करण्यासाठी कसोसिने प्रयत्न करीत आहे. मात्र चंद्रपूर जिल्ह्या नवीन प्रकारच्या नशेच्या आहारी, बालके, नवयुवक जातांना दिसून येत आहेत. गांजा, ड्रग्स , चरस, कोकीण आदी अंमली पदार्थांचे व्यसन मोठ्या प्रमाणात केले जात असून हे व्यसन जिल्हाभर पसरत आहे. या व्यसनाच्या आहारी जावून बालके गुन्हेगारीकडे वळत आहेत. बल्लारपूर शहरात बऱ्याच  ठिकाणी १५  ते २५  वयोगटातील मुले जंगल, झुडूपांमध्ये जावून नशा करीत आहेत. यामधून चोेरी, डकैती, अवैध व्यवसाय वाढीस लागले आहेत.
बल्लापूर शहरात काही दिवसांआधी चंद्रपूर येथील सुनिल शालिक चांदेकर(३३)  यांना १५  ते २०  वर्षे वयोगटातील मुलांनी रात्री ११  वाजता रस्तयात अडवून त्यांच्याकडून ४  हजार ८००  रूपये रोख हिसकाविले. त्यांचा मोबाईलसुध्दा हिसकाविला. यानंतर दगडाने डोके फोडून मारझोड केली होती. दुसऱ्या  दिवशी या घटनेची तक्रार बल्लारपूर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली. यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी सुशिलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनात बल्लारपूरचे ठाणेदार प्रदिप सिरस्कर यांनी तपासाचे आदेश दिले. पोलिस उपनिरीक्षक स्वप्नील निराळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक संजु पोंदे, सुंचूवार, निंबाळकर, कुमोद खनके, अजय कटाईत, अनुप आष्टनकर, जितेंद्र यांनी तक्रारदाराने दिलेल्या वर्णणावरून संपूर्ण शहरात आपले चक्र फिरविले. अवघ्या चार तासात दोन आरोपींना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी  केली असता गुन्ह्याची कबुली दिली. दोघांना न्यायालयाने एका दिवसाची पोलिस कोठडी ठोठावली. त्यांच्याकडून २५०० रूपये रोख व सॅमसंग कंपनीचा मोबाईल जप्त करण्यात आला. आणखी चौकशी  केल्यानंतर या युवकांकडून १२  मोबाईल संच जप्त करण्यात आले. तसेच गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकीसुध्दा जप्त करण्यात आल्या. या गुन्ह्यात सहभागी दोन अल्पवयीन युवकांनासुध्दा ताब्यात घेण्यात आले. या आरोपींविरूध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बालगुन्हेगारांना गांजा, चरस, ड्रग्स , कोकीणचे व्यसन लागल्यामुळे असे गुन्हे करून व्यसन पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत होते. व्यसनाच्या आहारी शहरातील शाळा काॅलेजमधील मुले जात असून त्यांच्याकडून नानाविध गुन्हे घडत आहेत. नशा करण्यासाठी पैसे राहत नसल्यामुळे युवक चोरी, मारझोड, लुटमारी करीत आहेत. या गुन्हेगारीवर वेळीच आळा घातला नाही तर येत्या काही दिवसात रौद्ररूप बघायला मिळेल, असे बोलल्या जात आहे. गुन्हेगारांचा कसून तपास पोलिस उपनिरीक्षक बावणे व राजेंद्र मेश्राम करीत आहेत. असा प्रकार शहरात कुठेही आढळून आल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

   Print


News - Chandrapur | Posted : 2017-09-03
Related Photos