विद्यार्थी म्हणतात ; शहरात कचऱ्याचे ढिगारेच दिसतात, कचरापेटी लावा


- नगराध्यक्षांना निवेदन ; 'डिझाइन फॉर चेंज ' उपक्रम
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
मनीष गांधी / समुद्रपूर :
गरपंचायतीमध्ये सर्वत्र कचऱ्याचे ढिगारेच दिसतात . शहरात कोठेही फिरले तरी कचऱ्यामुळे जीव कासावीस होतो. प्लास्टिकच्या  कचऱ्याची  विल्हेवाट न लावता अनेकवेळा जाळला जातो. यामुळे प्रदूषणात कमालीची वाढ झाली असून विद्यार्थ्यांसह नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे . हा सर्वत्र विखुरलेला कचरा गोळा करण्याकरिता प्रत्येक दुकान व पानटपरीसमोर कचरापेटी लावा असे निवेदन विकास विद्यालय व कमलनयन जमनालाल बजाज फाऊंडेशन यांच्या संयुक्तपणे 'डिझाइन फॉर चेंज ' उपक्रमातंर्गत विद्यार्थ्यांनी नगराध्यक्ष शिला सोनारे यांना निवेदन दिले .
देशामध्ये स्वच्छ भारत अभियान सुरू आहे.आपली नगरपंचायत हागणदारी मुक्त झाली. पण कचऱ्याचे ढिगारे सर्वत्र आढळतात. आठवडी बाजार , शासकीय कार्यालये ,तहसिल कार्यालयासमोर , प्रत्येक दुकान , पानटपरी , मंगल कार्यालय , रस्ते, नदी , नाले  असे कोठलेही ठिकाण घेतले तरी कचरा हा ठरलेलाच असतो. शहरात कोठेही फिरले तरी कचऱ्यामुळे आमचा जीव कासावीस होतो.कचरा निर्मूलनाकरिता नगरपंचायत कोठलिही उपाययोजना करित नाही. आम्हा विद्यार्थ्यासह नागरिकांचेही आरोग्य धोक्यात आले आहे. आमचेच कुणी मित्र डेंगी , मलेरिया सारख्या आजारांनी ग्रस्त आहे. शहरात ठिकठिकाणी असलेला कचरा गोळा करण्याकरिता कचरापेटी प्रत्येक प्रतिष्ठानासमोर लावण्यात यावी तसा नियमच करावा व रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी नगराध्यक्ष शिला सोनारे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. यावेळी रसिका चाफले, पायल पाल , आचल सहस्त्रबुध्दे, कैलास गिरी, साक्षी दांडेकर, खुशी जांभुळकर या विद्यार्थ्यांनी उपक्रमामागील भूमिका, कचऱ्याची निर्मिती , दूषपरिणाम आदी बाबींचे मांडणी नगराध्यक्ष शीला सोनारे यांच्याकडे केली. उपनगराध्यक्ष रविंद्र झाडे , पाणीपुरवठा सभापती गजानन राऊत , नगरसेवक मधूकर कामडी , सचिन सोनोने ,ललित जामुनकर , प्रताप मंगरूळकर, नितेश थुल , ललित डगवार, अंगद सेलकर आदी उपस्थित होते .

 पंतप्रधानांना पाच हजार पत्र लिहिणार 
नगरपंचायतीने कोठलिही कार्यवाही केली नाही तर आमच्या शाळेतील हजार विद्यार्थ्यांसह तालुक्यातील विविध शाळातील विद्यार्थी मिळून पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाच हजार पत्र लिहून आम्ही विद्यार्थी दाद मागणार असेही विद्यार्थ्यांनी निवेदनात नमूद केले आहे.

 दर शनिवारी प्लास्टिक निर्मूलन मोहीम राबविणार 

'डीझाइन फॉर चेंज ' हा पुर्णतः विद्यार्थांचा उपक्रम आहे .कचऱ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते. त्यामुळे कचरा निर्मूलनासाठी विद्यार्थांनी उचललेले पाऊल धाडसी असले तरी कौतुकास्पद आहे . कचरा निर्मूलनाकरिता दर शनिवारी शहरातील मुख्य रस्त्यावर कचरा निर्मूलन मोहीम शाळेच्या वतीने राबविण्यात येईल.
 प्राचार्य  शशिकांत वैद्य 
विकास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय

 उपक्रमास अर्थसहाय्य करणार 

विद्यार्थ्यांचा उपक्रम प्रेरणा देणारा असून या उपक्रमात वाघाडी फाऊंडेशनचे सर्व सदस्य सक्रीय सहभाग घेऊन अर्थसहाय्यासह हवी ती मदत करणार.
     मंगेश थुल,   अध्यक्ष  वाघाडी फाऊंडेशन

मागणी बाबत लवकरच निर्णय घेऊ 

कचरा निर्मूलनाकरिता नगरपंचायतीचे प्रयत्न सुरूच असून विविध उपाययोजनाही राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या मागणीवर लवकरच निर्णय घेण्यात येईल. शनिवारी ( ता. एक ) व्यापारी, छोटे व्यावसायिक, पानटपरी चालक यांची बैठक घेऊन तशा सुचना त्यांना देण्यात येईल .
  नगराध्यक्ष  शीला सोनारे

उपक्रमास बाल गणेश मंडळ मदत करेल

 शहराला स्वच्छ सुंदर बनविणारा उपक्रम आहे . बाल गणेश मंडळाच्या वतीने आम्ही सर्व सदस्य ह्या उपक्रमात सहभागी होऊन आर्थिक मदतही करू .
    वृषभ राजूरकर, सचिव बाल गणेश मंडळ , समुद्रपूर  Print


News - Wardha | Posted : 2017-08-31
Related Photos