बिआरएसपीतर्फे राज्यभर ‘आरक्षण विरोधी षडयंत्रे’ पर्दाफाश परिषद


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
जिल्हा प्रतिनिधी / चंद्रपूर:
देशात, राज्यात आर्थिक विकासाचे ढोल ताशे वाजविले जात असताना सर्वत्र आरक्षण मागणारे समुह वाढत आहेत. हा प्रचंड विरोधाभास भाजपच्या सरकारकालीन अपत्य आणि आपत्ती होय. एका बाजूला सरकारी नोकर्या निर्मितीचा दर घटला असताना व सार्वजनिक उद्योगधंद्यांचे मोठ्या प्रमाणात सरकार खासगीकरण करीत असताना विविध समुहांना राज्यातील सरकार आरक्षण धोरणाचे खोटे गाजर दाखवून जातिसमुहांचा विश्वासघात करीत आहे. सरकारचा हा खोटारडेपणा व फसवे विकासाचे धोरण राज्यातील जनतेसमोर मांडण्यासाठी राज्यात २० आॅगस्टपासून २४ सप्टेंबरपर्यंत बहुजन रिपब्लिकन समाज पार्टीच्या वतीने आरक्षण विरोधी षडयंत्रे पर्दाफाश परिषदांचे आयोजन केले जात आहे.
या परिषदांमधून केंद्र व राज्य सरकारची आरक्षण विरोधी धोरणे, खाजगकीकरणामुळे आरक्षण धोरणाला मुठमाती व खासगी क्षेत्रामध्ये आरक्षण धोरणाची अंमलबजावणी या बाबीची विस्तृत मांडणी होणार आहे. शिवाय न्यायालयाच्या विविध निर्णयांमुळे संविधानात्मक आरक्षणालासुध्दा नवीन मर्यादा निर्माण झाल्या आहेत. ही गंभीर बाब विचारात घेवून केंद्र सरकारने सर्वसमावेशक विचार करून कायद्याच्या चैकटीत बसणारा स्वतंत्र नवीन आरक्षण कायदा बनविणे व त्या आधारे देशातील राज्यांनी त्या माॅडेलवर राज्यस्तरीय कायदे बनविणे ही देखील आवश्यक बाब बनली असून यासंदर्भातसुध्दा बिआरएसपी तर्फे प्रबोधन करणार असल्याचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. सुरेश माने यांनी म्हटले आहे.
राज्यातील दलित, आदिवासी, भटके विमुक्त, मुस्लिम, एसबीसी व ओबीसी समाज घटकांचे हित संविधानातील आरक्षण धोरणाने कसे संरक्षित केले आहे व देशातील केंद्र व राज्य सरकार या आरक्षण धोरणाला कसा सुरूंग लावत आहे याची विस्तृत मांडणी या परिषदांद्वारे केली जाणार आहे. आज २५ आॅगस्ट रोजी चंद्रपूर येथे परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. २७ आॅगस्ट रोजी नागपूर व त्यानंतर मुुंबई, औरंगाबाद, अमरावती, बीड, जळगाव व कोल्हापूर येथे परिषदांचे आयोजन करण्यात येणार आहे. २४ सप्टेंबर रोजी पुणे येथील शनिवारवाडा मैदानात परिषदेचा समारोप होणार असल्याचे अॅड. माने यांनी सांगितले.

   Print


News - Chandrapur | Posted : 2017-08-25
Related Photos