ट्रक पलटून दहा जनावरे जागीच ठार, १९ जनावरे जखमी


- स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने  केला पाठलाग
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / धामणगाव रेल्वे :
नागपूरवरून चोरट्या मार्गाने गोवंशीय जनावरे कत्तलीसाठी नेली जात असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पाठलाग केला. यावेळी भरधाव जात असलेला ट्रक उलटून झालेल्या अपघातात १० जनावरे जागीच ठार झाली असून १९ जनावरे जखमी झाल्याची घटना सकाळी ५.३०  वाजताच्या सुमारास अशोकनगर गावाजवळ घडली.
मागिल अनेक दिवसांपासून नागपूर येथून अमरावतीला चोरट्या मार्गाने गोवंशीय जनावरांची कत्तलीसाठी तस्करी केली जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा पथकास मिळाली. दरम्यान आज पहाटे धामणगाव रेल्वे तालुक्यातील वरूड बगाजी मार्गे आर्वीवरून अमरावतीला जनावरांनी भरलेले दोन ट्रक जात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी दोन्ही ट्रकांचा पाठलाग केला. यातील एक ट्रक पसार झाला. एमएच ०४ सिजी ३४१९  क्रमांकाचा टक अशोकनगर अजनसिंगी मार्गावर पलटला. यामध्ये १० जनावरे ठार झाले. या घटनेची माहिती मिळताच अशोकनगर, ढाकूलगाव येथील ग्रामस्थांनी जखमी जनावरांना उपचारासाठी मदत केली.
या ट्रक मधील दोन आरोपी अलताफ खाॅ उर्फ राजा रशिद (२२) , मुक्तार शेख मुस्ताक शेख (२८) यांना अटक केली. इम्रान रा.  टेकानाकर, छन्नू ट्रक चालक, बारक्या रा. नागपूर, जनावरे भरून देणारा शकील कुरेशी रा. वाडी, जनावरे घेणारा गुल्लू कुरेशी हे आरोपी फरार झाले आहेत. पोलिसांनी साडेतीन लाखांचा ऐवज जप्त केला आहे. मृतक जनावरांवर घटनास्थळीच शवविच्छेदन करून पुरण्यात आले. जखमी जनावरांना उपचारासाठी हलविण्यात आले. 
जिल्हा पोलिस अधीक्षक अभिनाषकुमार, अप्पर पोलिस अधीक्षक एम.एम. मकानदार यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिस निरीक्षक किरण वानखेडे, नरेंद्र ठाकरे, वासुदेव नागलकर, सुनिल मलातपुरे, राजेंद्र ठाकरे, सय्यद यांनी ही कारवाई केली आहे. घटनास्थळावर दंगा नियंत्रण पथक, तळेगाव दशासर, कुर्हा, तळेगाव, दत्तापूर येथील पोलिसांची चमू दाखल झाली होती.

   Print


News - Rajy | Posted : 2017-08-10
Related Photos